शेळीच्या लेंडीखत विषयी

v   शेळीच्या लेन्डीखत विषयी

v   शेती करताना शेतीसाठी खताचे महत्व अनन्य साधारण आहे.उत्तम पिक मिळवण्यासाठी उत्तम बियाण्याइतकेच महत्व उत्तम खतदेखील तितकेच महत्वाचे आहे .खतावरच झाडाला मिळणारे पोषण अवलंबून असते.प्रामुख्याने खताचे दोन प्रकारात विभागणी केल्यास रासायनिक व सेंद्रिय असे प्रकार दिसून येतात.रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर अलीकडील काळात झाला आहे.अर्थातच हरित क्रांती नंतरच्या काळात.परंतु ह्याच्या अंधाधुंद वापरामुळे जमिनीवर,पिकावर,उत्पन्नावर विपरीत परिणाम दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या व शास्त्रज्ञांचा कल सेंद्रिय खताकडे झालेला दिसून येत आहे.सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्न वाढवणे सहज शक्य होत असून त्याचे जमिनीवर,पिकावर कसलेच दुष्परिणाम दिसून येत नाही.

         सेंद्रिय खत म्हटले कि दोन प्रकार ठळकपणे दृष्टीक्षेपात येतात .एक तर गायीम्हशींचे शेणखत व दुसरे म्हणजे शेळ्या मेंढ्याचे लेंडीखत .सध्यस्थितीत शेतकरी शेणखत अधिक प्रचलित आहे.याचे कारण म्हणजे सहज उपलब्धता व त्याच्या अधिकात अधिक प्रचार/प्रसार .तसेच ते ज्याच्या त्या हंगामात त्वरित पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध करून देतात. विक्रीकरिता साठवण करायचे झाल्यास दोन्ही खतांच्या साठवण प्रकारात तफावत दिसून येते.शेणखतात इतर कचरा जसे चाऱ्याचे शिल्लक अवशेष,घरघुती कचरा कमी दिसून येतो तर लेन्डीखतात जास्त दिसून येतो. त्यामुळेही शेतकरी या खतास कमी पसंती दर्शवितात.याविरुद्ध जर लेन्डीचे  गुणधर्म जाणून घेतले तर लक्षात येईल कि लेंडीखत कसे फायदेशीर असते.
गायीम्हशिंच्या शेणापेक्षा शेळीच्या लेन्डीमध्ये जलधारणा क्षमता अधिक असते.पूर्णपणे सुकलेली लेंडी अतिशय टणक असते.ती सहज फुटत नाही.म्हणून ती उन्हाळभरही शेतात जशीच्या तशी राहू शकते.जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा ती प्रथम पाणी शोषून घेते.अशा वेळेस ती मूळ आकारमानापेक्षा दोन ते तीन पट अधिक मोठी झालेली दिसून येते.म्हणजेच वाढलेल्या आकारमानात केवळ पाणीच असल्याने जमिनीची जलधारणा क्षमता वाढते.लेन्डीतील पाणी हळूहळू पिकास उपलब्ध होत राहते व त्याचसोबत लेन्डीमधील अन्नद्रव्ये .याचसारखा एक प्रचलित व लोकप्रिय सिंचन प्रकार म्हणजे ठिबक सिंचन सारखे हुबेहूब कार्य लेंडीखत करते.म्हणूनच लेंडीखत वापर असलेली पिके कमी पाणी व अपुऱ्या पावसास शक्यतो कमी बळी पडतात. लेन्डीखताची हि क्षमता समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया.काही पूर्ण वाळलेल्या लेंड्या घेवून त्या पाण्यात १-२ तास भिजत ठेवा.१-२ तासानंतर त्यांचे आकारमान वाढलेले दिसून येईल.त्यांनी पाणी शोषून घेतलेले असेल.त्यानंतर त्या लेंड्या सुकवायला ठेवा.भर उन्हात सुद्धा त्या ३-४ दिवस सुकणार नाही.यावरून हे सिद्ध होते कि पिके घेताना पाणी वाचवण्यासाठी ,उन्हाळ्यात ,कमी पाणी असताना शेळीचे लेंडीखत भरघोस पिक घेण्यास उपयुक्त आहे.
                     रासायनिक खते लोकप्रिय होण्याचे एक कारण म्हणजे या खतांमुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही.जसे शेणखत वगैरे शेतात टाकताना त्यासोबत तणांचे बी शेतात जावून शेतात तणांची वाढ होते.हे टाळण्यासाठी शेणखत सडवने/कुजवणे यासारख्या प्रक्रिया कराव्या लागतात.परंतु लेन्डीखतावर अशी कुठलीही प्रक्रिया करावी लागत नाही.आता हे सिद्ध करण्यासाठी परत एक प्रयोग करून पाहूया.एका शेळीची व एका गायीची/म्हशीची/बैलाची आवश्यकता पडेल.दोघांनाही प्रत्येकी १००-१०० ग्राम अतिशय बारीक बिया असलेले धान्य चारुया.उदा.ज्वारी,बाजरी,राजगिरा,तीळ,इत्यादी.रात्री चारल्यानंतर सकाळी शेणाचे व लेन्डीचे आळीपाळीने निरीक्षण करा.गायीम्हशिंच्या शेणात जसेच्या तसे बियाणे बाहेर पडलेले दिसून येईल तर शेळीच्या लेन्डीतून दिसून येणार नाही किवा अतिशय नगण्य प्रमाण असेल.यावरून हे सिध्द होते कि शेळीमेंढीच्या खतातून तणांचा प्रसार होत नाही.जर प्रसार होतही असेल तर तो साठवण पद्धतीतील त्रुटीमुळे होतो.मग योग्य साठवण पद्धत काय असेल याबद्दल जाणून घेवू.
              लेंडीखत साठवताना त्यात चाऱ्याचे उर्वरित अवशेष जाणार नाही याची दक्षता घ्यावी.  
               चारा देण्यासाठी गव्हाण वा तत्सम चारा पात्रांचा उपयोग करावा.
                  बारीक बी असलेला परिपक्व चारा शेळयापुढे बांधणे टाळावे.
सबब शेळीच्या खतापासून तणांचा प्रादुर्भाव होत नाही तर तो खत साठवण पद्धत त्रुटीमुळे होतो.हे लक्षात ठेवून खताचे व्यवस्थापन करावे.    
                 लेन्डीखताच्या कमी उपलब्धतेमुळे ह्याचा उपयोग व्यापारी पिकांमध्ये करणे शक्य होत नाही.उदा.कापूस,सोयाबीन.परंतु भाजीपाला पिके,चारा पिके परसबाग,फळबाग अशा पिकासाठी लेन्डीखताचा उपयोग करणे सहज शक्य आहे आणि अधिक फायदेशीर ठरतो. शहरी भागांमध्ये कुंड्यांमधील शोभेच्या झाडांसाठी लेंडीखतास ग्राहकांची विशेष पसंती दिसून येते.करिता या माध्यमातून रोजगाराच्या संधी ग्रामीणांना उपलब्ध होतात.या खतास इंटरनेटवर online बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहेतच.सरासरी.१६ते३०रुपये किलोपर्यंतच्या दराने ते विकले जाते.अशा प्रकारे खत तयार करावयाचे झाल्यास १ किलो खतासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी.५०० ग्राम सगळी लेंडी,३५०ग्राम अर्धवट चुरा केलेली लेंडी,५० ग्राम कडूनिम्बाची पाने,१००ग्रम कडूनिंब पेंड एकत्र करून आकर्षक लेबलसह packing करावे.     
                  देशी गायींच्या शेणापासून बनलेल्या गौरीसारखे शेळीच्या खतास धार्मिक महत्व सहसा दिसून येत नसले तरी इतर कामांसाठी अवश्य वापर होताना दिसून येतो .कोंबडीघरात लहान पिलांना उब मिळावी म्हणून तर शेतात शेतमालाचे रानटी जनावरांपासून संरक्षण करताना धूर निर्मितीसाठी लेन्डीखताचा वापर होतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी