शेळीच्या गोठ्याविषयी



शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना,नदीनाल्यात कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घातले जात नाही.किंवा बहुतेक मोठे शेळीपालक सकाळ व संध्याकाळ दोन वेळा . अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोषही आहेत. फायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो. मात्र या पद्धतीने फार प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्‍यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात. त्याला बंदिस्त किंवा बंदगोठा शेळीपालन असे म्हटले जाते.

त्याशिवाय ज्या शेतकर्‍यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकाट शेळीपालनही शक्य नाही अशा शेतकर्‍यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरते. त्यामध्ये थोडा वेळ शेळ्या ठाणबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चरायला सोडल्या जातात. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनासाठी कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हा प्रकारच अधिक व्यवहार्य ठरणार आहे. मोकाट शेळी पालनामध्ये आंतरप्रजनन होत असते. त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो. पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजनानवर नियंत्रण ठेवू शकतो. बंदिस्त पालनात शेळ्यांच्या चार्‍यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरी आहे. परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भराभर वाढत जाते. जी गोष्ट मोकाट शेळी पालनात शक्य नाही. बंदिस्त शेळी पालनाचा आणखी एक फायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणि लक्ष ठेवू शकतो. बंदिस्त शेळीपालन करणार्‍यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा. या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत. निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूने कुंपण असलेले असावे. म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील आणि काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसलेल्या गोठ्यात येतील.

कोंबड्याप्रमाणे त्यांना चोवीस तासात छपराच्या गोठ्यात बांधण्याची गरज नाही. गोठा थोडा उंचावर बांधावा. त्यात हवा खेळावी यासाठी आजूबाजूला जाळी असावी. तसेच पावसाचे पाणी गोठ्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. चारा देण्यासाठी त्रिकोणी वा अर्ध गोलाकार तुकडे करून त्यांच्या गव्हाणी बनवाव्यात. त्या गव्हाणीमध्ये चारा आणि खुराक टाकता यावा. गोठा बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गोठा बांधण्यासाठी फार करू नये. क्रॉंक्रिटच्या भिंती, सिमेंटचे पत्रे यांची काहीही आवश्यकता नाही. मात्र कोणाला हौस म्हणून पॉश गोठा बांधायचा असेल तर त्यांना कोण अडवणार ? परंतु अशा गोठ्यावर होणारा खर्च हा अनुत्पादक खर्च असतो आणि तो शेळ्यांच्या व्यवसायातून वसूल होणे अवघड जाते. मग नफ्या-तोट्याचे गणित बिघडते. शेळी पालन उद्योगामध्ये शेळीचे आरोग्य हा विषय सर्वात महत्वाचा असतो. त्यामुळे शेळीचा गोठा तयार करताना आरोग्याचा विचार करावा लागतो. विशेषत: शेळ्यांचे मलमूत्र त्या गोठ्यात साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागते.

अजूनही बर्‍याच शेतकर्‍यांमध्ये शेळ्यांच्या मरण्याविषयी काही गैरसमज आहेत. शेळ्यांना रोग होऊन त्या पटापट मरतात असे बर्‍याच लोकांना वाटते. मात्र असे शेळ्या मरण्याचे प्रकार फार अपवादात्मक असतात. परंतु असा एखादा प्रकार घडला की, त्याच्या बातम्या वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणावर छापून येतात आणि आधीच असलेला गैरसमज अधिक दृढ होतो. याचा अर्थ शेळ्या मरत नाहीत असा नाही, तर असे प्रकार फार कमी असतात आणि शेळ्यांच्या विविध रोगांसाठी द्यावयाच्या लसी वेळेवर दिल्या तसेच अधूनमधून आवश्यक असलेले औषध त्यांना देत गेलो तर शेळ्या मरण्याची शक्यता नसते. शेळ्यांच्या अंगावर गोचीड, पिसवा, उवा, लिखा यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचीडनाशक पाण्याची आंघोळ घालावी. शेळ्यांना जंतनाशक औषध सुद्धा पाजावे लागते. ते वर्षातून दोनदा पाजले जाते. अशा औषधांची माहिती आणि उपचार यासंबंधी आपल्या नजिकच्या जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातल्या काही लसी या दवाखान्यात मिळत असतात. त्यांचा वापर करावा.

सांघिक शेळीपालन

शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते. आपण फक्त मटणाचा विचार करतो. पण शेळीची कातडी, शिंग, खूड, हाडे आणि केस यांचे किती उपयोग होतात याचा आपण कधी विचारच करत नाही. हा प्रत्येक अवयव उपयोगाचा असतो. शेळीच्या कातडीचा उपयोग तर कसा होतो असतो हे आपल्याला माहीतच आहे. पर्स, बॅगा तयार करण्यासाठी ही कातडी वापरली जाते. त्यानंतर हाडे. बर्‍याच जणांना हाडांचा एक उपयोग माहीत आहे, तो म्हणजे खत म्हणून. कोणत्याही जनावरांच्या हाडांची भुकटी शेतामध्ये खत म्हणून उपयुक्त असते. परंतु शेळीच्या हाडांची पावडर टूथ पेस्टमध्ये मिसळली जाते. म्हणजे आपण ज्या टुथपेस्टने दात घासतो तिच्यात शेळीच्या हाडांची पावडर मिसळलेली असते. हाडांमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे टुथपेस्टमध्ये ती मिसळली की, त्या टुथपेस्टमुळे दात मजबूत होतात, हा त्यामागचा विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहाराची कडक पथ्ये पाळत असतात. त्यातल्या ज्या लोकांना टुथपेस्टमध्ये हाडे असतात हे माहीत असते ते लोक टुथपेस्टने दात घासत नाहीत ते यामुळेच. शेळीच्या शिंगापासून हस्तकलेद्वारा काही आकर्षक शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. अशा वस्तू परदेशात पाठविल्या तर त्यांना चांगली किंमत येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी

शेळीच्या लेंडीखत विषयी